श्री मल्लिकार्जुन I मल्लिकार्जुन मंदिर I विलासगड येडेनिपाणी I Mallikarjun Temple I Yedenipani

 मल्लिकार्जुन मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून हजारो भाविक येत असतात. अगस्ती ऋषींनी हे तीर्थक्षेत्र वसविल्याचा तसेच पत्नी लोपामुद्रा यांच्यासह अगस्ती ऋषी येथे वास्तव्याला असल्याचा उल्लेख पुरातन ग्रंथामध्ये आढळत असल्याचे स्थानिक लोकांकडून सांगितले जाते.

सांगली जिल्ह्यात टेकडय़ा तशा कमीच. त्यामुळे गिरीदुर्ग तसे तुरळक आढळतात, पण जेवढय़ा टेकडय़ा आहेत तितकी देवस्थानं मात्र बांधून काढलेली दिसतात. या डोंगरशिखरांची पार्श्वभूमी लाभलेल्या गावांपैकी एक म्हणजे येडेनिपाणी. गावाला खेटून असलेली उंच टेकडी हे त्या गावाचं भूषण आहे. या टेकडीवर मल्लिकार्जुन मंदिर नावाचं सांगली जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं शिवालय आहे. टेकडीचा शिवकाळात उपयोग दुर्गबांधणीसाठी होत असे. या टेकडीवर विलासगड किल्ला असून त्याचा वापर टेहळणीसाठी केला जात असे. किल्ल्याचं मूळ दैवत कोटेश्वर असलं तरी श्री मल्लिकार्जुनाचं भव्य मंदिर हे किल्ल्याचीच नव्हे तर अख्ख्या परिसराची ओळख आहे हे जाणवतं. मल्लिकार्जुन मंदिराला नेटकी तटबंदी असून काही पायऱया चढून मोठय़ा प्रवेशद्वारातून मंदिरात प्रवेश करता येतो. मंदिर गुहेत बांधलेलं असून आतच आजूबाजूंना काही गुहा दिसतात. एका गुहेत भैरवनाथाचं मंदिर आहे. त्याशेजारी असलेल्या गुहेचा साठवणीचे कोठार म्हणून उपयोग केला जात असावा. मुख्य मंदिरात शिरल्यावर दिवा ठेवण्यासाठी दगडात कोरलेल्या काही दिवडय़ा दिसतात. मल्लिकार्जुन मंदिर हे पाच खांबांवर बांधलेलं असून गाभाऱयात प्राचीन शिवपिंडी दिसते. मंदिराबाहेर नंदी मंडप असून मंदिराच्या आजूबाजूला किल्ल्याच्या सर्वसाधारण खुणा विखुरलेल्या दिसतात. सर्वप्रथम मंदिराच्या डाव्या बाजूला भलीमोठी चुन्याची घाणी दिसते. मंदिराला जोडून असलेला विलासगड हा गिरीदुर्ग या दुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. किल्ल्यावर वाडेसदृश अनेक जुनी बांधकामं दिसतात. काही पाण्याच्या टाक्या पण आहेत. गड बांधल्यापासूनची विठ्ठल-रुक्मिणी, कृष्ण आदी देवतांची काही मूळ मंदिरं आजही आपलं अढळ स्थान भूषवताना दिसतात. गिरीदुर्गप्रेमींनी ठिकठिकाणी माहितीपर फलक लावल्यामुळे किल्ल्याची व त्यातल्या महत्त्वाच्या वास्तूंची माहिती चटकन मिळते. आदिलशाही काळातील हजरत चाँद बुखारी बाबाचा दर्गा ही पण एक गडावरची उल्लेखनीय वास्तू आहे. तो पुनरुज्जीवित केला एका मराठी माणसाने हेही वैशिष्टय़पूर्ण. नवनाथ पांडुरंग जाधव याने गेल्या सात पिढय़ांपासून चालत आलेला दर्ग्याच्या देखरेखीचा वारसा आजच्या घडीला चोख चालवला आहे. दर्ग्याच्या बाह्य भागावर असलेल्या कोनशिलेवर तसा लेख पण आढळतो. गडावरून पूर्वेला त्यामानाने दूर असलेल्या टेकडीवर मच्छिन्द्रगडाचे दर्शन होते. या मल्लिकार्जुन शिवस्थानाबद्दल एक काशीखंडातली सहाव्या अध्यायातली कथा सांगितली जाते आणि ती खुद्द मंदिरातही माहिती म्हणून लिहिलेली आहे. अगस्ती मुनी कोल्हापूरहून निघाल्यानंतर मल्लिकार्जुन पर्वती गेले. त्या क्षेत्राची महती त्यांच्या स्वबळाने लक्षात आली. स्नानसंध्या करून त्यांनी शिवलिंगाची यथासांग पूजा केली. नंतर पत्नी लोपामुद्रेला ते म्हणाले, या क्षेत्री शिखर पाहिले असता जन्म मरणाचे फेरे संपतात व आईवडिलांना उद्धार होऊन पैलासपद प्राप्त होते. अनेक कोटी जन्म पुण्य केले तरी हे फळ मिळत नाही. या पंचक्रोशीत मरण आले असता सायुज्य मुक्ती मिळेल असा साक्षात भगवान शंकराचा वर आहे. यावर लोपामुद्रा उत्तरली, मला असा प्रश्न आहे की, जर या मंदिराचे शिखर पाहता पुनर्जन्म नाही तर काशीचा वियोग न करता याच स्थानी आपण पुढे का राहू नये? यावर अगस्ती म्हणाले, मल्लिकार्जुन, रामेश्वर, धारातीर्थ, त्र्यम्बक, ओंकारेश्वर, कुरुक्षेत्र, ब्रह्मगिरी, कुशकवर्त, महाबळेश्वर, अशी मोक्षदायी तीर्थे पुष्कळ आहेत, पण तिथे सायुज्यमुक्ती मिळत नाही. सायुज्यमुक्ती म्हणजे मृत्यूनंतर देवाशी एकतत्त्व होऊन मुक्त होणे. अनेक प्रकारे मुक्ती प्राप्त होते अशी काही स्थाने आहेत जसे द्वारका, मधुपुरी, अयोध्यापुरी, काशी, कांची, अवंतिका, माया, अरुणा, हिमालय, केदार, सेतुबंध, वरुणा, ही तीर्थे केल्याने काशी केल्याचे फळ प्राप्त होते. क्षेत्र मल्लिकार्जुन या स्थानाचा असा प्राचीन संदर्भ सापडतो. पुढे शिवकाळात इथे विलासगड हा किल्ला बांधला गेला आणि मंदिराचे पुनरुज्जीवन झाले. विलासगड-मल्लिकार्जुन टेकडीच्या मागच्या बाजूला टक्केश्वराचा डोंगर आहे. टेकडीवरूनच टक्केश्वराला जाता येते. हेही शंकराचे देवस्थान असून त्याचेही नूतनीकरण केलेले दिसते. येडेनिपाणीच्या अगदीच शेजारी गोठखिंडी गावात अमृतेश्वराचं शिवालय आहे. तसे मंदिर आधुनिक असले तरी मंदिरात काही वीरगळ आणि दगडात घडवलेल्या जैन मूर्ती दिसतात, त्यावरून या मंदिराच्या आणि गावाच्या प्राचीनत्वाची प्रचीती येते. या मूर्ती तिथे कशा आल्या याची काही ठोस माहिती मिळत नाही, पण गावकऱयांची त्या मूर्तींविषयी आस्था आणि जागरूकता या कृतीतून आपल्याला जाणवल्याशिवाय राहवत नाही. Contact Us: निसर्ग शेती आणि गांव I Nature Agriculture and Village YouTube :- https://www.youtube.com/channel/UCW6GHXFyeC-2z_dRPUU6MfQ Blog - https://natureagricultureandvillage.blogspot.com Facebook - https://www.facebook.com/profile.php?id=61553464371433



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli