झेंडू विक्रमी उत्पादनासाठी करा ही सोपी कामे I Drenching I Favarani I Khat Vyavasthapan I Farming

 खत व्यवस्थापन :

झेंडूच्या संकरित जाती खताला उत्तम प्रतिसाद देतात. जमिनीची मशागत करताना हेक्‍टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश या खताची द्यावी. संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धी नत्राची मात्रा रोपांची पुनर्लागवड करताना किंवा पुनर्लागवडीनंतर एका आठवड्यांनी द्यावी. उर्वरित अर्धी नत्राची मात्रा ही रोपांच्या पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावी. नत्राची मात्रा जास्त झाल्यास पिकाची शाखीय वाढ भरपूर होते. फुलांचे उत्पादन कमी मिळते. दर्जेदार उत्पादनासाठी शिफारशीनुसारच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ठिबक सिंचनाने शिफारशीनुसार विद्राव्य खते वापरावीत. ठिबक सिंचनामधून पाणी व विद्राव्य खतांची मात्रा द्यावी. लागवड करताना प्रत्येक ठिकाणी एकच रोप लावावे. बाजारभावाचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन करावे. शेंडा खुडणे : झेंडू हा उंच वाढणारा झेंडू असून त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे येण्याच्या उद्देशाने शेंडा खुडला जातो. शेंडा खुडण्याने उंच सरळ वाढणाऱ्या रोपाची वाढ थांबते, भरपूर बगल फुटी फुटतात, त्यामुळे झाडाला झुडपासारखा आकार येतो. शेंडा खुडण्यास फार वेळ झाला तर अपेक्षित परिणाम मिळत नाही. आंतरमशागत : रोप लागवडीनंतर दोन आठवड्यांनी खुरपणी करावी. खुरपणी करताना रोपाला भर द्यावी, त्यामुळे रोपे फुलाच्या ओझ्यांनी कोलमडत नाहीत. पाणी व्यवस्थापन : खरीप हंगामात पाऊस नसेल तर १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. रब्बी हंगामात ८ ते १० दिवसांनी, तर उन्हाळी हंगामात ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे. फुलांचे उत्पादन चालू झाल्यानंतर फुलांची काढणी पूर्ण होईपर्यंत पाण्याचा ताण पडू देऊ नये. कीड नियंत्रण : झेंडूवर पांढरी माशी, लाल कोळी, मावा, तुडतुडे व केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. नियंत्रण : प्रादुर्भाव दिसताच ॲसिफेट एक ग्रॅम किंवा डायमेथोएट एक मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. लाल कोळीच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल २ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. रोग नियंत्रण : मर : हा बुरशीजन्य रोग आहे. उष्ण व दमट हवामानात याचा प्रादुर्भाव होतो. लक्षणे : पाने पिवळी पडतात, मुळे कुजतात, परिणामी झाड वाळून जाते. रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट झाडाजवळ एक लिटर पाण्यात एक ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळून आळवणी करावी, तसेच फवारणी करावी. करपा : हा बुरशीजन्य रोग आहे. रोगाचा प्रादुर्भाव प्रथमत: झाडाच्या खालच्या पानांवर दिसून येते. तेथून रोग वरपर्यंत विस्तारतो. लक्षणे : पानावर काळे ठिपके दिसतात, ते पुढे विस्तारतात. त्यामुळे पाने गळतात, झाड मरते. नियंत्रण : रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगट पाने जाळून टाकावीत. नियंत्रणासाठी मॅंकोझेब ०.२ टक्के किंवा कार्बेन्डाझिम ०.१ टक्के द्रावणाची आलटून पालटून १५ दिवसाच्या अंतराने २ ते ३ फवारण्या गरजेनुसार कराव्यात.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

निसर्गशक्तीचे प्रतीक श्रीगणेश I गणेशखिंड I Shri Ganesh I Gnapati I Ganeshkhind Bhavaninagar Sangli